ताश्कंद
ताश्कंद : रशियन संघराज्यातील उझबेकिस्तान प्रजासत्ताकाची राजधानी. लोकसंख्या १५,९५,००० (१९७५). मध्य आशियातील खुष्कीच्या व्यापारी मार्गावर वसलेले हे प्राचीन मोठे शहर सिरदर्या नदीच्या चिरचिक या उपनदीवर आहे. ट्रान्स–कॅस्पियन लोहमार्गामुळे याची अधिकच भरभराट झाली. हे मोठे औद्योगिक केंद्र असून येथे शेतीची अवजारे, खाणयंत्रे, रेडिओ, विजेच्या तारा व उपकरणे, रसायने, फर्निचर, कातडीसामान, मातीची भांडी, अन्नपदार्थ यांचे मोठे कारखाने व पीठगिरण्या, कापडगिरण्या, कापूस पिंजणे, मद्ये, डबाबंद पदार्थ, मांस, तंबाखू, इ. विविध उद्योग आहेत.